स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने केलेल्या कारवाईत दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल १४७ ग्रॅम मफेड्रान (एमडी) जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ४४ लाख १० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई शनिवारी (दि. १२) जी.टी.बी. नगर, अँटॉप हिल परिसरातील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे युनिटचे पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मफेड्रान (एमडी) आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. आतिफ नबील शेख (वय २२) आणि मन्सुर मोहम्मद शेख (वय ३०), दोघेही अँटॉप हिल, मुंबई येथील रहिवासी आहेत.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या १४७ ग्रॅम मफेड्रानची किंमत ४४ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (अंमली पदार्थ कक्ष) पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.

