कऱ्हाड प्रतिनिधी
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळाल्यानंतर उसाच्या शेतात लपलेल्या सराईत चोराचा शोध घेण्यात कऱ्हाड तालुका पोलिसांना सातारा श्वान पथकातील ‘जॅक’ या श्वानाने मोलाची कामगिरी बजावली. दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील कपड्याचा वास घेत जॅकने थेट उसाच्या शेतात धाव घेतली आणि तेथे लपलेल्या संशयितापर्यंत पोलिसांना पोहोचविले. पोलिसांनी वैभव विठ्ठल कोठावळे (वय २७, रा. माळवाडी-मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील दुशेरे येथील नदीकाठच्या डाग शिवारात ही घटना घडली. शेताकडे जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करून संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांना विनानंबरची दुचाकी आणि त्यावर अडकवलेली कपड्याची पिशवी आढळून आली. प्रत्यक्षदर्शींनी संशयित उसाच्या शेतात पळून गेल्याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने उसाच्या शेतासह परिसर पिंजून काढला. मात्र, दाट उसामुळे संशयिताचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत श्वान पथकाची मदत मागवली. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार सातारा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
श्वान पथकातील ‘जॅक’ याने दुचाकीवरील पिशवीतील कपड्याचा वास घेतला. त्यानंतर त्याने थेट उसाच्या शेताच्या दिशेने धाव घेत संशयित लपलेल्या ठिकाणाचा माग काढला. पोलिसांनी त्या दिशेने शोध घेतला असता कोठावळे उसामध्ये लपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, पोलिस आणि ग्रामस्थांनी घेरल्यानंतर संशयिताने आपण मुका असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या चौकशीत त्याचा बनाव उघड झाला. पोलिसांनी त्याला बोलते केल्यानंतर त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक कोल्हाळ यांनी सांगितले.
दरम्यान, चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दुचाकीबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे मंगळसूत्र चोरीच्या प्रयत्नाबरोबरच दुचाकी चोरीच्या प्रकरणाचाही तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
या कारवाईत कऱ्हाडचे पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक फौजदार खाडे, हवालदार दत्तात्रय तायशेटे, मनोज बुधावले, सचिन निकम, भूषण माने, प्रफुल्ल गाडे, योगेश गायकवाड, प्रदीप धस आणि विकास शेडगे यांनी कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
उसाच्या शेतात लपून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोराचा डाव मात्र ‘जॅक’ने हाणून पाडला. त्यामुळे या कारवाईत पोलिसांच्या तपासकौशल्याबरोबरच श्वान पथकाच्या कामगिरीचेही विशेष कौतुक होत आहे.

