स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळईंची चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ट्रेलरमधून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळई चोरी करून त्याबदल्यात पैसे घेणाऱ्या या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ६४ लाख २५ हजार ९९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेला काही इसम आपापसांत संगनमत करून पैशांच्या मोबदल्यात ट्रेलरमधून बांधकामाच्या लोखंडी सळई चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले.
२८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५.५५ वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत घाटकोपर पूर्व येथील हायवे सुविधा शौचालयाजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी आरोपी ३८ हजार ३८० किलो लोखंडी सळई चोरी करताना आढळले. या सळईंची किंमत २३ लाख २ हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर चुनाभट्टी येथील जुगानी इंडस्ट्रियल इस्टेटमध्येही कारवाई करण्यात आली. येथे १ लाख ४ हजार ७५० किलो वजनाच्या लोखंडी सळई चोरी करताना आरोपींना पकडण्यात आले. या सळईंची किंमत ३१ लाख २३ हजार १९० रुपये आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५४ लाख २५ हजार ९९० रुपये किमतीच्या लोखंडी सळई जप्त केल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले एकूण १ कोटी १० लाख रुपये किमतीचे तीन ट्रेलर आणि एक आयशर टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण १ कोटी ६४ लाख २५ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेत गुन्हा क्रमांक १४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३१६ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा क्रमांक ११०७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ७ मार्फत सुरू आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले, पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, अफरोज शेख, महेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हार, नामदेव परबळकर तसेच कक्ष ७ कार्यालयातील पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.


