अंधेरीतील नामांकित हॉटेलवर वर्सोवा पोलिसांचा मध्यरात्री छापा
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत अंधेरी पश्चिमेतील नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेला एमडी (मेफेड्रॉन) विक्रीचा डाव उधळून लावला. एस.व्ही.पी. नगर म्हाडा परिसरातील हॉटेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना वर्सोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या (एटीसी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १५५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले असून, त्याची बाजारातील किंमत अंदाजे ७ लाख ७५ हजार रुपये आहे. आरोपींकडून दोन आयफोनही हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अंधेरी परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहाराचे धागेदोरे पुन्हा एकदा समोर आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे आणि एटीसी पथक नियमित गस्त व तपासणीचे काम करत होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत परिसरातील हॉटेल आणि लॉजची तपासणी सुरू होती. याचवेळी पथकातील पोलीस हवालदार खोंडगे यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. अंधेरी पश्चिमेतील एस.व्ही.पी. नगर म्हाडा परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या रूम क्रमांक १०४ मध्ये दोन व्यक्ती एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आल्याचे या माहितीमध्ये सांगण्यात आले होते.
या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड-वारे यांना तातडीने माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त, वर्सोवा विभाग यांना याबाबत अवगत करण्यात आले. माहितीची खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मिळताच एटीसी पथकाने मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित हॉटेलवर छापा टाकला.
पोलिसांनी रूम क्रमांक १०४ मध्ये प्रवेश केला असता तेथे दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यांची झडती आणि चौकशी केली असता त्यांच्याकडे एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ आढळून आला. हा पदार्थ विक्रीच्या उद्देशाने आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथक आणि दोन पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचनामा करण्यात आला. या कारवाईत १५५ ग्रॅम मेफेड्रॉन, दोन आयफोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एमडीचा पुरवठादार कोण? पोलिसांकडून कसून तपास
आरोपींनी हा अंमली पदार्थ नेमका कुठून आणला, त्यांचा पुरवठादार कोण आहे, तसेच मुंबईतील आणखी कोणत्या ठिकाणी या अमली पदार्थाची विक्री केली जाणार होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आरोपींच्या मोबाईल फोनमधील माहिती आणि संपर्कांच्या आधारे या व्यवहारामागील मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड-वारे, पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्राजक्ता पवार आणि रात्रपाळी पोलीस निरीक्षक अमर डेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे, पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार खोंडगे, पोलीस शिपाई खैरनार आणि पोलीस शिपाई ठोंबरे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे करीत आहेत.


