मुंबई प्रतिनिधी
मुंबई : न्यू पनवेल येथील पुनर्विकास प्रकल्पातील केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (सीजीएसटी) २४ फ्लॅट्सचा ताबा देणे आणि ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी करण्याच्या मोबदल्यात एक कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने सीजीएसटीचे अधीक्षक पंकज कुमार आणि सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांना अटक केली. सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर पंकज कुमार यांनाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
रायगड जिल्ह्यातील न्यू पनवेल, सेक्टर-१७ येथे एका खासगी रिअल इस्टेट कंपनीकडून दोन इमारतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पाशी संबंधित सीजीएसटीच्या २४ फ्लॅट्सचा ताबा देणे तसेच त्यासाठी आवश्यक एनओसी जारी करण्याच्या बदल्यात सीजीएसटी अधीक्षक पंकज कुमार यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत प्रकल्पाच्या प्रमुखाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करून सापळा रचला.
तपासादरम्यान लाचेची एक कोटी रुपयांची रक्कम तीन टप्प्यांत देण्याचे ठरल्याचे समोर आले. त्यापैकी दहा लाख रुपये रोख, एका फ्लॅटसाठी २० लाख रुपये डाऊन पेमेंट आणि उर्वरित ७० लाख रुपये दिल्लीतील डीजी एचआरडी, सीजीएसटी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
सीबीआयच्या माहितीनुसार, पंकज कुमार यांनी तक्रारदाराला दहा लाख रुपये सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांच्याकडे देण्यास सांगितले होते. ठरलेल्या योजनेनुसार तक्रारदाराकडून दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताच सीबीआयच्या पथकाने प्रसाद कुमार स्वामी यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर या प्रकरणातील दुसरे आरोपी पंकज कुमार यांनाही अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.

