स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : कुरिअर आणि ई-कॉमर्स कंपन्यांची फ्रँचायजी देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मालाडमधील एका कॉल सेंटरवर मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१० ने कारवाई केली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकासह नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत २० नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, आणखी तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेच्या कक्ष-१० ला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर २४ ऑगस्ट रोजी मालाड पश्चिम येथील लिंक रोडवरील एव्हरशाईन मॉल परिसरात असलेल्या इन्स्टा ट्रान्सफर बिझ प्रायव्हेट लिमिटेड या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. या कंपनीचे मालक, एचओडी आणि व्यवस्थापक टेलिकॉलर्सच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्राबाहेरील नागरिकांशी संपर्क साधत होते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा, ब्लू डार्ट, डीटीडीसी, बिग बास्केट यांसारख्या विविध कुरिअर आणि ई-कॉमर्स कंपन्यांशी करार असल्याचे खोटे सांगून नागरिकांना ‘लाइफटाइम पार्सल डिलिव्हरी फ्रँचायजी’ देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यातून मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-१० येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून, बांगूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८२४/२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६६(ड) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान कंपनीच्या संचालकासह नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १०५ संगणक हार्डडिस्क, ३२ लॅपटॉप, ३० मोबाईल फोन, पाच टॅब तसेच १०० हून अधिक फ्रँचायजी करारपत्रे असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या फसवणुकीत आतापर्यंत २० नागरिक बळी पडल्याचे समोर आले असून, गुन्हे शाखेकडे आणखी तक्रारी येत आहेत. संबंधित कंपनीकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी गुन्हे शाखेच्या कक्ष-१० शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पश्चिम) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत गुन्हे शाखा कक्ष-१० चे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत बावचकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक जगदीश धारगळर, पोलीस हवालदार अमित जगताप, पांडुरंग बाबर, अमर तडवी तसेच पोलीस अंमलदार चंद्रशेखर डफळे, अनिकेत निकम, निलेश मांडवे, दिनेश परब, सुधाकर निर्मळे आणि अभिजित अत्याळकर यांनी सहभाग घेतला.

