रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
ठाणे : बसमध्ये प्रवासादरम्यान आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या तीन सराईत आरोपींना गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या एकूण २० लाख ५३ हजार रुपये किमतीच्या १३० ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या बांगड्या हस्तगत करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
दादलानी पार्क, अशोकनगर, बाळकूम येथील रहिवासी कल्पना शिरीष पाटणकर (वय ६१) या २० जुलै रोजी दुपारी लुईसवाडी बसस्टॉपवर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-१ कडून सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलीस हवालदार संदिप महाडीक आणि पोलीस शिपाई अमोल ढावरे यांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून आरोपींबाबत खात्रीलायक माहिती मिळवली. त्यानंतर पथकाने सापळा रचून कपिल सुरेश तीजंगे (वय ३८), पौर्णिमा सुरेश तीजंगे उर्फ कल्लू कल्पना (वय ३२) यांना ३ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर दीपक वतन अभंगे (वय ४८) याला २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या तपासात आरोपींनी नौपाडा, ठाणेनगर आणि राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. नौपाडा पोलीस ठाण्यातील एक, ठाणेनगर पोलीस ठाण्यातील चार आणि राबोडी पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोलीस हवालदार संदिप महाडीक आणि पोलीस शिपाई अमोल ढावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

