स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : बीएमसीचे कर्मचारी असल्याचे भासवून रिक्षा थांबवून प्रवाशाकडून दंडाच्या नावाखाली १९ हजार ५०० रुपये उकळणाऱ्या तिघांना खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकलींसह १ लाख १० हजार ८५० रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
ही घटना २५ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हंसभुग्रा जंक्शन, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाकोला पुलाखाली घडली होती. फिर्यादी जुबीन मुकेश शहा हे अंधेरीहून रिक्षाने घरी जात असताना दोन मोटरसायकलींवरील आरोपींनी त्यांची रिक्षा थांबवली. आम्ही बीएमसीचे कर्मचारी असून रिक्षात सिगारेट ओढल्याबद्दल दंड भरावा लागेल, असे सांगत आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. शहा यांनी बीएमसीचे ओळखपत्र मागितल्यानंतर आरोपींनी दुसऱ्या मोटरसायकलीवरील आपल्या साथीदाराकडे बोट दाखवत त्याला भेटण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीकडून १९ हजार ५०० रुपये घेऊन आरोपी चौकीत येण्यास सांगून मोटरसायकलीवरून पसार झाले.
याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी खेरवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने तिघांना पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
अमित संभाजी कुळये (३४), सुधीर दयानंद पुजारी (३२) आणि विनोद गणेश सदर (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमित कुळये याच्याविरुद्ध पवई आणि जुहू पोलीस ठाण्यांत यापूर्वी चोरी, जबरी चोरी, मारहाण आणि फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. विनोद सदर याच्याविरुद्धही पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या होंडा शाईन आणि होंडा युनिकॉर्न या दोन मोटरसायकली तसेच १० हजार ८५० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख १० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस शिपाई जाधव आणि पोलीस शिपाई कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत पवई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रनोद माने, पोलीस हवालदार झेंडे आणि पोलीस शिपाई राठोड यांनी विशेष सहाय्य केले.

