मुंबई प्रतिनिधी
जेवणाचे संपूर्ण बिल देण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना गोरेगाव पश्चिमेतील प्रेमनगर परिसरात घडली. हॉटेलसमोर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात अजीज मोहम्मद अतिक खान (३०) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करत गोरेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली.
११ ऑगस्टच्या रात्री प्रेमनगर परिसरातील सलमान हॉटेलसमोर अजीज खान याचा दोन अनोळखी इसमांशी जेवणाचे पूर्ण बिल भरण्यावरून वाद झाला. सुरुवातीचा शाब्दिक वाद काही वेळातच विकोपाला गेला. आरोपींनी अजीजवर हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळच असलेल्या फळांच्या लाकडी बॉक्सच्या पट्ट्याने त्याच्या डोक्यात जोरदार वार करण्यात आले.
या हल्ल्यात अजीज गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर नागरिकांनी त्याला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेने प्रेमनगर परिसरात खळबळ उडाली.
सहा पथकांकडून आरोपींचा शोध
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यासाठी सहा विशेष तपास पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी परिसरातील गुप्त बातमीदार तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास कारवाई करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
अजय मुन्नी उपाध्याय (३९) आणि विकास देवराज पासवान (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हत्येच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

