सांगली प्रतिनिधी
कुपवाड परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात झाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषा मोहन केसरेकर (वय उपलब्ध नाही) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे पती मोहन केसरेकर हेही गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपी फरीद शेख याने मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला. त्यानंतर मनिषा केसरेकर यांच्या पोटात चाकूने वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
दोघांनाही गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मनिषा केसरेकर यांचा मृत्यू झाला. मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी फरीद शेख फरार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मिरज-सांगली मार्गावरील वानलेसवाडी येथील बंद पडलेल्या मैत्रेय इमारतीजवळ थांबलेला असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटनेनंतर अवघ्या दोन तासांत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. प्राथमिक चौकशीत कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातूनच हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

