नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्ती व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर प्रकाश टाकणारा ‘एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ADR) चा ताजा अहवाल समोर आला असून, त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. देशातील ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अहवालानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या नावावर तब्बल १,४१३ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देशातील सर्व ३१ मुख्यमंत्र्यांची एकत्रित संपत्ती ३,६६० कोटी रुपये इतकी असून त्यापैकी मोठा हिस्सा एकट्या शिवकुमार यांच्या संपत्तीचा आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू असून त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर तमिळनाडूचे सी. जोसेफ विजय यांच्याकडे ६४८ कोटी रुपये, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू यांच्याकडे ३३२ कोटी रुपये, तर नागालँडचे नेफ्यू रिओ यांच्याकडे ४६ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला अव्वल स्थानावर असून त्यांच्याकडे केवळ ५५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी (८५ लाख रुपये), राजस्थानचे भजनलाल शर्मा (१.४६ कोटी रुपये), उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ (१.५४ कोटी रुपये) आणि पंजाबचे भगवंत मान (१.९७ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
अहवालातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ३१ पैकी १४ मुख्यमंत्र्यांनी स्वतःवर गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. यापैकी ११ मुख्यमंत्र्यांवर हत्येचा प्रयत्न, भ्रष्टाचार, लाचखोरी, फसवणूक आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गुन्हेगारी प्रकरणांच्या संख्येच्या बाबतीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आघाडीवर असून त्यांच्या विरोधात ८९ गुन्हे नोंद आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी यांच्यावर २९, तर डी. के. शिवकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर प्रत्येकी १९ गुन्ह्यांची नोंद असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेले असे अहवाल लोकप्रतिनिधींची आर्थिक स्थिती आणि त्यांच्यावरील न्यायालयीन प्रकरणांविषयी मतदारांना पारदर्शक माहिती उपलब्ध करून देतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होते.
सर्वाधिक संपत्ती असलेले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री राज्य संपत्ती
डी. के. शिवकुमार कर्नाटक १,४१३ कोटी
एन. चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश ९३१ कोटी
सी. जोसेफ विजय तमिळनाडू ६४८ कोटी
पेमा खांडू अरुणाचल प्रदेश ३३२ कोटी
नेफ्यू रिओ नागालँड ४६ कोटी
सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री राज्य संपत्ती
उमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीर ०.५५ कोटी
सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगाल ०.८५ कोटी
भजनलाल शर्मा राजस्थान १.४६ कोटी
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश १.५४ कोटी
भगवंत मान पंजाब १.९७ कोटी
ADR च्या अहवालातील ठळक मुद्दे
देशातील ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण घोषित संपत्ती ३,६६० कोटी.
१४ मुख्यमंत्र्यांनी स्वतःवर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले.
११ मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रलंबित.
डी. के. शिवकुमार सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री.
उमर अब्दुल्ला सर्वात कमी संपत्तीचे मुख्यमंत्री.
रेवंत रेड्डी यांच्यावर सर्वाधिक ८९ गुन्ह्यांची नोंद.


