सांगली : प्रदीप जोशी
जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलाला प्राप्त झालेल्या २७ वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलासाठी वाहने, अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने, पोलीस ठाण्यांसाठी इमारती अशा विविध माध्यमांतून पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण आणि अंतर्गत कामकाजासाठी ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सन २०२६-२७ च्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३ कोटी १९ लाख ६२ हजार ५४३ रुपये किमतीची एकूण २७ वाहने खरेदी करण्यात आली आहेत. यामध्ये एक्सयूव्ही ७ एक्सओ-२, स्कॉर्पिओ-५, बोलेरो-१४, ट्रॅक्स तुफान-५ आणि आयशर ट्रक-१ अशा वाहनांचा समावेश आहे. ही वाहने पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून सांगली जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाली आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावीपणे कामगिरी बजावण्यात या वाहनांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


