मुंबई प्रतिनिधी
पिढ्यान्पिढ्या अवघ्या १६० चौरस फुटांच्या खोलीत दाटीवाटीने संसार थाटणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळवासीयांचे प्रशस्त घराचे स्वप्न अखेर साकार झाले. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ५५७ रहिवाशांच्या हाती नव्या टू बीएचके सदनिकांची चावी सुपूर्द करण्यात आली. अनेक वर्षांचा संघर्ष, प्रतीक्षा आणि जुन्या चाळीतील आठवणी मागे टाकत रहिवाशांनी नव्या घरात प्रवेश करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्यामुळे बीडीडीवासीयांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि स्वप्नपूर्तीची ठरली आहे.
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील तीन इमारतींमधील ५५७ रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी सर्वप्रथम शिवसेनेने पुढाकार घेतला होता. त्यामुळे नव्या घरांची चावी हाती पडल्यानंतर अनेक रहिवाशांनी शिवसेनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केल्याबद्दल शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचेही रहिवाशांनी आभार मानले.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ऐवजी सचिन अहिर, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
२०३० पर्यंत सर्व बीडीडीवासीयांना हक्काची घरे!
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी या तिन्ही ठिकाणच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एकूण १५ हजार ८०४ पुनर्वसन सदनिकांपैकी आतापर्यंत ३ हजार ९३३ सदनिकांचे वाटप रहिवाशांना करण्यात आले आहे. तिन्ही प्रकल्पांतील घरांचे काम डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर वरळी पुनर्विकास प्रकल्पातील दोन हजार घरे जून २०३० पर्यंत पूर्ण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
६८ वर्षांच्या आठवणींना निरोप; नव्या घरात सुखाचा संसार!
नव्या घराची चावी हाती पडल्याचा आनंद रहिवाशांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आयुष्याची तब्बल ६८ वर्षे बीडीडी चाळीत घालवलेल्या गवंत पालांडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, चाळीतील छोट्याशा खोलीत दोन ते तीन कुटुंबे गुण्यागोविंदाने राहत होती. अशा परिस्थितीत कधीतरी प्रशस्त फ्लॅटमध्ये राहायला मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.
दुसऱ्या एका रहिवाशानेही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमच्या तीन पिढ्यांनी चाळीतील याच घरात आयुष्य घालवले. आज नव्या घराची चावी मिळाल्याने आयुष्यातील हा सोन्याचा दिवस ठरला आहे. जुन्या घराशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत; मात्र नव्या घराचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही.
एकेकाळी मुंबईच्या कामगार चळवळीचे आणि गिरणी कामगारांच्या संघर्षाचे साक्षीदार असलेल्या बीडीडी चाळींमधील रहिवाशांसाठी हा पुनर्विकास केवळ घरांचा बदल नाही, तर अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या सन्मानाच्या जगण्याची सुरुवात आहे. १६० चौरस फुटांच्या खोलीतून ५०० चौरस फुटांच्या प्रशस्त घरात जाण्याचा हा प्रवास अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराची दिवाळी ठरला आहे.


