महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील परीक्षांच्या तारखा निश्चित; प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मंडळाच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत होणार असून, दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ दरम्यान पार पडणार आहे.
लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचेही वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेतली जाणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ दरम्यान होणार आहे.
या परीक्षांसंदर्भातील अंतिम वेळापत्रक मंडळाने अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण वेळापत्रक पाहता येणार आहे. परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांनी उपलब्ध कालावधीचा योग्य वापर करून अभ्यासाचे नियोजन करण्याची गरज आहे.


