कर्जतमधील कार्यक्रमात ४० वर्षांच्या जमिनीच्या संघर्षाचा पाढा; प्रशासकीय कारभारावरही सडकून टीका
कर्जत प्रतिनिधी
कर्जत : टोरेंट पॉवर कंपनीच्या ३ हजार मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याच्या मुद्द्यावरून अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आक्रमक झाले आहेत. वृक्षतोडीला विरोध करत आंदोलनात सहभागी झालेल्या सयाजी शिंदे यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात आपल्या जमिनीच्या ४० वर्षांच्या संघर्षाचा अनुभव मांडत प्रशासकीय व्यवस्थेवर जोरदार टीका केली. तसेच शेतकऱ्यांनी दलालांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करताना ‘टोरेंट असो किंवा इतर कोणताही दलाल, त्यांना पळवून मारा,’ असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.
आपल्या जमिनीचा अनुभव सांगताना सयाजी शिंदे म्हणाले की, १९७८ मध्ये धरणामुळे त्यांची जमीन गेली. त्यावेळी मोबदला म्हणून केवळ १४ हजार रुपये मिळाले. तब्बल ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जमीन मिळाली; मात्र प्रशासकीय अडचणी संपल्या नाहीत. वीस वर्षांपासून सरकारकडून जमिनीची कागदपत्रे दाखवली जात होती, पण प्रत्यक्ष जागेवर जमीन नव्हती. कागदपत्रे मिळाली की जागा गायब आणि जागा मिळाली की कागदपत्रे गायब, असा प्रकार सुरू होता. ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आपल्याला हक्काची जमीन मिळाली. मात्र, त्या जागेवरही अतिक्रमण झाले होते. ते हटवल्यानंतर अखेर वाकडी-तिकडी जागा मिळाल्याची व्यथा त्यांनी मांडली.
पूर्वी आपण वॉचमन म्हणून काम करत असल्याचे सांगत त्यांनी जुन्या सहकाऱ्यांच्या परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांच्यासोबत काम करणारे अनेक सहकारी आता निवृत्त झाले आहेत. एकेकाळी दोन-तीन एकर जमिनीचे मालक असलेले हे लोक आज अवघ्या २४० चौरस फुटांच्या घरात राहण्यास भाग पडले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या हातून गेलेल्या जमिनींचे आज कोट्यवधी रुपये मूल्य झाले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना सावध करताना ते म्हणाले की, आज जमिनी घेताना शेतकऱ्यांना १० ते २० लाख रुपये दिले जातात. मात्र, त्यातूनही काही एजंट आणि सरकार आपला वाटा काढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दलालांच्या जाळ्यात अडकू नये. चार भावांना जमिनीचे चार स्वतंत्र तुकडे मिळायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. आम्हाला आठ एकर जमीन मिळणे अपेक्षित होते. पण कागदपत्रांच्या खेळात नेमके काय सुरू आहे, हेच समजत नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करताना सयाजी शिंदे म्हणाले, एकत्र राहिलात तरच जमिनीचा खरा भाव आणि महत्त्व समजेल. मी स्वतः या त्रासातून गेलो आहे. झाडांमध्ये देव असतो, मग थोड्याशा पैशांसाठी तो विकायचा का? थोडे पैसे घेऊन कुठे जाणार? जमिनीचे खरे मोल काय आहे, याची जाणीव नंतर होईल, असे सांगत त्यांनी जमिनी आणि वृक्षसंपदेचे महत्त्व अधोरेखित केले.


