महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही मारली बाजी, पाच मुख्यमंत्र्यांच्या विशेष यादीत पहिला क्रमांक
नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता संपली असून फेम इंडिया मॅगझीन आणि एशिया पोस्टने जाहीर केलेल्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशात अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, या सर्व्हेतील ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ या स्वतंत्र श्रेणीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला क्रमांक मिळवत राज्याची मान उंचावली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील या सर्व्हेत योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी आपली छाप पाडली आहे.
फेम इंडिया मॅगझीन आणि एशिया पोस्ट यांच्या वतीने देशातील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला. सुशासन, कायदा-सुव्यवस्था, नेतृत्वक्षमता, व्यक्तिमत्त्व, जनमानसातील प्रतिमा, कार्यक्षमता, प्रशासकीय कामकाजाची समज, लोकप्रियता, दूरदृष्टी आणि कार्यशैली अशा विविध निकषांच्या आधारे मुख्यमंत्र्यांना गुणांकन देण्यात आले. एकूण एक हजार गुणांच्या या मूल्यांकनात योगी आदित्यनाथ यांनी ८९७ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला.
योगी आदित्यनाथ देशात अव्वल
या सर्व्हेमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ८८१ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ८७४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ८५६ गुण मिळवत चौथे स्थान पटकावले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ८४४ गुणांसह पाचव्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू ८४२ गुणांसह सहाव्या, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग ८३८ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी ८२७ गुणांसह आठव्या, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव ८०३ गुणांसह नवव्या, तर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा ८०२ गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिले.
‘मुख्यमंत्री पंचरत्न’मध्ये फडणवीस नंबर वन
या सर्व्हेमधील विशेष आकर्षण ठरले ते ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ हे स्वतंत्र वर्गीकरण. या श्रेणीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७८८ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. त्यांच्या नेतृत्वशैलीसह प्रशासकीय कामकाज आणि कार्यक्षमतेची दखल या सर्व्हेमध्ये घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ७६८ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ७६६ गुणांसह तिसऱ्या, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल ७६० गुणांसह चौथ्या, तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ७४६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिले.
दहा निकषांवर मुख्यमंत्र्यांची कसोटी
मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना केवळ लोकप्रियतेचा विचार न करता प्रशासकीय पारदर्शकता, उत्तरदायित्व, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, कायद्याचे राज्य आणि गुन्हेगारी नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचाही विचार करण्यात आला. याशिवाय निर्णयक्षमता, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, सार्वजनिक प्रतिमा आणि भविष्यातील विकासाचे नियोजन या निकषांनाही महत्त्व देण्यात आले.
लोकप्रियता आणि जनस्वीकृतीबरोबरच सरकारी योजनांची अंमलबजावणी, धोरणात्मक निर्णयांचे परिणाम आणि राज्याच्या भविष्यासाठी आखलेली दिशा यांचाही गुणांकनात समावेश करण्यात आला.
एकूणच, देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी अव्वल स्थान मिळवले असले, तरी ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ श्रेणीत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या सर्व्हेची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.


