मुंबई प्रतिनिधी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात डॉक्टर, महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आरोपीला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.
‘नागरिकांचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. पोलीस आरोपींचे संरक्षण करत आहेत, अशी परिस्थिती आम्हाला नको,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांना सुनावले. आरोपीला रिमांडसाठी प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची मागणी ‘अत्यंत इनोव्हेटिव्ह’ असल्याचेही न्यायालयाने उपरोधिकपणे नमूद केले.
अधिकारी स्वतःची वेगळी कार्यपद्धती सुरू करू पाहत आहेत का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, या निर्णयामागे नेमके कोणते अधिकारी होते, याची माहितीही न्यायालयाने मागितली. याप्रकरणी पुढील सुनावणीवेळी ठाणे पोलीस आयुक्तांना न्यायालयात बोलावण्याची शक्यता असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.
‘आणखी काही दिवस आत राहू द्या’; म्हात्रेंना न्यायालयाचे खडे बोल
रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य आरोपींना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने त्यांच्या वर्तनावरही तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘म्हात्रेंना आणखी काही दिवस आत राहू द्या,’ अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. म्हात्रे यांच्या वयाचा उल्लेख करत अटी-शर्तींसह जामीन देण्याची मागणी करणाऱ्या त्यांच्या वकिलांनाही न्यायालयाने सवाल केला. ‘व्हिडीओ पाहिल्यावर तुमचे वय २५ वर्षे असल्यासारखे दिसते. महिलांना आणि डॉक्टरांना तुम्ही मारहाण केली,’ असे न्यायालयाने सुनावले.
‘तुम्ही समाजकार्यात आहात. लोकांची सेवा करणे हे तुमचे कर्तव्य आहे की त्यांना मारहाण करणे?’ असा सवालही न्यायालयाने केला. एखाद्या वकिलाने तुमचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला, तर त्यालाही मारहाण करणार का, असा सवाल करत न्यायालयाने म्हात्रे यांच्या वर्तनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; चौघांना अटक
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका महिला डॉक्टरसह नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर आहे.
या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरुवातीला तिघांना अटक केली. मात्र, नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून जोर धरल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली.
या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य आरोपींना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
म्हात्रेंच्या जुन्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चर्चा
दरम्यान, डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर रमेश म्हात्रे यांच्या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्यावर यापूर्वी हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे.
२००८ मध्ये म्हात्रे यांच्यावर जीवघेणा गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या शर्टच्या खिशातील पेनामुळे गोळीचा वेग काही प्रमाणात अडवल्याचे आणि तरीही गोळी पोटात घुसल्याचे सांगितले जाते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
या उपचारादरम्यान डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवल्याचा दावा केला जातो. यापूर्वीच्या एका हल्ल्यात त्यांच्या किडनीला गंभीर इजा झाल्यानंतरही याच वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केल्याचे सांगितले जाते.
म्हात्रे यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या सहकाऱ्यांवरच मारहाण केल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
आता या प्रकरणातील पोलिसांची भूमिका, आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिमांडसाठी हजर करण्याचा निर्णय आणि रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


