ठाणे प्रतिनिधी
ठाणे : शिवसेना (उबाठा) पक्षाला आणखी एक धक्का बसला असून, हिंगोलीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत हिंगोलीतील शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी एस. पी. राठोड, रमेश जाधव, सखाराम उबाळे आणि दुर्गे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते पक्षात सहभागी झाले.
डॉ. संतोष टारफे यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांनी समाजासाठी आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच परिसरातील प्रलंबित विकासकामे, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नव्या कार्यकर्त्यांची भर पडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.


