स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : बाबा ट्रेडिंग आणि एफएमसीजी कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षभरात रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून शिक्षकासह तब्बल ५० गुंतवणूकदारांची १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार मोहम्मद एजाज मोहम्मद रफिक सलाट याला जालना आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींनी मार्केटिंग क्षेत्रात ‘बाबा ट्रेडिंग’ या नावाने व्यवसाय सुरू केला होता. बाबा ट्रेडिंग आणि एफएमसीजी कंपनीत पैसे गुंतवल्यास वर्षभरात तिप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांकडून मोठ्या रकमा जमा करण्यात आल्या. मात्र, पैसे जमा झाल्यानंतर आरोपी पसार झाले.
शेरसवारनगर येथील तक्रारदार मोहम्मद फिरोज अब्दुल सत्तार हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांच्यासह त्यांचे भाऊ आणि परिचित अशा सुमारे ५० जणांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
या प्रकरणात यापूर्वी वसीम अहमद अब्दुल गफार (रा. इतवार गल्ली, कचोरी रोड, जुना जालना) आणि मोहम्मद युनुन अहमद मोहम्मद सलीम (रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) या दोघांना ७ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी एजाज सलाट हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो मोबाईल फोनचा वापर करीत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीदारांच्या मदतीने त्याचा शोध सुरू ठेवला. अखेर तो मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कदम आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे यांच्या पथकाच्या मदतीने एजाज सलाट याला रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जालन्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एनपीआयडी विशेष न्यायालयात हजर केले असता तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
या प्रकरणात आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बाबा ट्रेडिंग किंवा संबंधित एफएमसीजी कंपनीत गुंतवणूक करून फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, जालना येथे तक्रार अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, गोविंद दराडे आणि महिला पोलीस अंमलदार मंदा नाटकर यांनी ही कारवाई केली.


