मुंबई प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार, पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी २६ जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधू केंद्र सरकारविरोधात शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
🚨 वन नेशन, वन इमोशन! 🚨
२४ जुलै, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आमच्यासोबत सामील व्हा! दुपारी ४ वाजल्यापासून आपण सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि सायंकाळी ५ वाजता आपले राष्ट्रगीत गाऊया.
दिल्लीतील अमानुष दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2026
मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावर यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर ते पुन्हा एकत्र येत असल्याने या संयुक्त मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे उद्या भूमिका स्पष्ट करणार
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेली कथित वागणूक आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. २६ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या संयुक्त मोर्चाची दिशा आणि आंदोलनाची पुढील रणनीती स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते मोर्चाबाबत सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातही नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या मोर्चाला किती मोठा प्रतिसाद मिळतो, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.
‘तरुणांनो, तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका’
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत तरुणांना आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे. ‘तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.
दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरही आदित्य ठाकरे यांनी टीका केली. विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने वागण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी दिल्लीतील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
२४ जुलैला शिवाजी पार्कवर तिरंग्याखाली जमण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २४ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे नागरिक आणि तरुणांनी एकत्र यावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नव्हे, तर केवळ देशाच्या तिरंग्याखाली एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत म्हणत विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देऊया, असे त्यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारेही आंदोलनात उतरणार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने संवाद साधावा, अशी मागणी करत अण्णा हजारे गुरुवारी मौन आंदोलन करणार आहेत.
अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतरच्या धर्तीवर अण्णा हजारे ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, त्या जागेला प्रतीकात्मक स्वरूपात ‘नगरचे जंतर-मंतर’ असे संबोधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकीय पक्षांसह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजही मैदानात उतरू लागल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. आता २४ जुलैचे शिवाजी पार्कवरील आवाहन आणि २६ जुलैचा मुंबईतील संयुक्त मोर्चा याला किती प्रतिसाद मिळतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


