जळगाव प्रतिनिधी
जळगाव : राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत एका तरुणीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान त्याच्याकडील सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, तपास पूर्ण करून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
भरत बालाजी म्हस्के (वय ३४, रा. गोंदी खुर्द, ता. गेवराई, जि. बीड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जळगावचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, म्हस्के याने त्याच्या फेसबुक खात्यावर गिरीश महाजन यांच्यासोबत एका तरुणीचा फोटो पोस्ट करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५६ व ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढत पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे त्याचा शोध घेतला. त्यानंतर शिताफीने कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी जळगाव येथे आणण्यात आले.
चौकशीदरम्यान संशयिताने संबंधित फेसबुक पोस्ट स्वतः टाकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, तपास अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी संबंधित फेसबुक पोस्ट ‘सहयोग’ पोर्टलच्या माध्यमातून हटविण्यात आली होती. तसेच १९ जुलै २०२६ रोजी संशयिताचे सुमारे सहा हजार फॉलोअर्स असलेले फेसबुक खातेही ‘सहयोग’ पोर्टलद्वारे कायमस्वरूपी निलंबित करण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.


