सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण सातारा जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, संबंधित कालावधीत कोणत्याही व्यक्तीला तलवार, भाला, बंदूक, चाकू, सुरी, लाठी-काठी किंवा शारीरिक इजा होऊ शकेल, अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. तसेच फटाके वगळता इतर दाहक किंवा स्फोटक पदार्थांची वाहतूक करणे अथवा ते जवळ ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दगड, अस्त्रे किंवा फेकून मारता येतील, अशी हत्यारे गोळा करणे आणि सोबत नेण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
याशिवाय, कोणत्याही व्यक्तीचे प्रेत किंवा प्रतिमांचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, तसेच सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेला बाधा पोहोचेल, अशी भाषणे करणे किंवा सोंग आणण्यासही मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काही बाबींना या प्रतिबंधात्मक आदेशातून सूट देण्यात आली आहे. शारीरिक दुर्बलतेमुळे सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीने लाठी किंवा काठी वापरणाऱ्या व्यक्तींना हे निर्बंध लागू होणार नाहीत. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ आणि अंत्यविधी यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक फटाके विक्रेते तसेच सामान्य नागरिकांना फटाक्यांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करण्यास परवानगी राहणार आहे. त्याचप्रमाणे शांततेच्या मार्गाने आणि पूर्वपरवानगी घेऊन आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम आणि विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, हा या प्रतिबंधात्मक आदेशांचा उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


