छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याची १ लाख २० हजार रुपयांना विक्री करून त्या पैशांत सोन्याचे दागिने आणि ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना बाळाच्या विक्रीची साखळी छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडमार्गे थेट हैदराबादपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी जन्मदात्यांसह या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली असून, हैदराबादमधून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्याला ५ जुलै रोजी मुलगा झाला. मात्र, दारूचे व्यसन आणि निर्दयी वर्तनामुळे या दाम्पत्याने बाळाची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे.
यानंतर कौशल्या पवार आणि तिची मुलगी सीमा रेशवाल यांनी या बाळाचा व्यवहार ठरवला. ७ ऑगस्ट रोजी १ लाख २० हजार रुपये रोख देऊन बाळाचा ताबा घेण्यात आला. त्यानंतर सीमाने हे बाळ नातेवाईक संगीता आव्हाड हिच्याकडे २ लाख ७० हजार रुपयांना दिले.
संगीताने पुढे नांदेड गाठून स्वतःला डॉक्टर सांगणाऱ्या सुरेश राजाराम गुंटुका याच्यामार्फत बाळाची विक्री केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर बाळाला हैदराबाद येथील उमा गंगाधर खटकमे हिच्याकडे तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांना विकण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. अवघ्या ४८ तासांत बाळ चार जणांच्या हातातून फिरत थेट तेलंगणात पोहोचले.
विक्रीच्या पैशांत सोनं आणि दोन मोबाईल
बाळाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांचा वापर आरोपींनी वैयक्तिक मौजमजेसाठी केल्याचे तपासात समोर आले आहे. या पैशांतून ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दोन ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यवहारातील पैशांची साखळी आणि आर्थिक व्यवहारांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
कुटुंबाला आरोपी करण्याची धमकी दिल्यानंतर दिली माहिती
मुकुंदवाडी पोलिसांनी सुरुवातीला बाळाच्या जन्मदात्यांसह सीमा रेशवाल आणि कौशल्या पवार यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सीमा माहिती देण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, संपूर्ण कुटुंबाला आरोपी करून अटक करण्याची तयारी पोलिसांनी दर्शवल्यानंतर तिने या प्रकरणातील महत्त्वाची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, अंमलदार राजाभाऊ कोल्हे आणि देविदास खेडकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान हैदराबादमधून बाळाची सुरक्षित सुटका करण्यात आली. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार बाळाला एका संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
या प्रकरणात कौशल्या पवार, सीमा रेशवाल, संगीता आव्हाड, सुरेश राजाराम गुंटुका आणि उमा गंगाधर खटकमे यांच्यासह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाळाच्या खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा तसेच संपूर्ण आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू आहे.


