छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासकामांना गती देण्यात येत असून, छत्रपती संभाजीनगरमधील विविध प्रकल्पही दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जातील. या विकासकामांच्या माध्यमातून शहराचा विकासात्मक कायापालट होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. कामांची सद्यःस्थिती, बांधकामाचा दर्जा आणि प्रगतीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, माजी खासदार भागवत कराड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेल्या सारथी इमारतीच्या कामाची पाहणी करताना त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली. या ठिकाणी प्रशासकीय इमारत, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह आणि अभ्यासिका अशा चार इमारती उभारण्यात येत आहेत. दोन्ही वसतिगृहांमध्ये प्रत्येकी ५२८ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असेल. या प्रकल्पाचे उर्वरित बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
याशिवाय महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज-२ अंतर्गत सुरू असलेली बांधकामे आणि नेहरूनगर येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठी उभारण्यात येत असलेल्या निवासी इमारतीचीही त्यांनी पाहणी केली. या प्रकल्पांच्या कामांचा दर्जा राखून उर्वरित बांधकामे वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
नगर नाका ते पडेगाव या सहापदरी रस्त्याच्या कामाची पाहणी करून डांबरीकरण, ड्रेनेज व्यवस्था, बांधकामाची गुणवत्ता आणि कामाचा वेग यांचा आढावा घेण्यात आला. तसेच वाळूज-पंढरपूर-कॅम्ब्रिज-शेंद्रा एमआयडीसी या प्रस्तावित उन्नत रस्ते प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली. सर्व प्रकल्पांमध्ये गुणवत्तेचे निकष पाळून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.


