सातारा प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कासच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून जुलैअखेरीस जलवाहिनीचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सातारा पालिकेने निश्चित केले आहे. त्यानंतर योजनेची तांत्रिक चाचणी घेऊन शहरात टप्प्याटप्प्याने अखंडित व मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे.
सुमारे १०२.५६ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेअंतर्गत २७ किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यापैकी केवळ २०० मीटरचे काम शिल्लक असून ते जुलैअखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रायोगिक चाचण्यांद्वारे संपूर्ण यंत्रणेची कार्यक्षमता तपासली जाणार आहे.
योजनेमुळे सध्या उपलब्ध असलेला ६ एमएलडी पाणीपुरवठा वाढून ३५ एमएलडीपर्यंत पोहोचणार आहे. शहराच्या गरजेनुसार १४ एमएलडी पाणी सातारा शहरासाठी उपलब्ध करून उर्वरित २१ एमएलडी पाणी शाहूनगर, विलासपूर, जगतापवाडी, करंजे तर्फ सातारा, गोडोली, रामराव पवारनगर, इंदिरानगर, झोपडपट्टी परिसर, विसावा नाका, पीरवाडी तसेच सदरबाजारच्या पूर्वेकडील भागाला पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवीन जलवाहिनी जुन्या पाइपलाइनला समांतर टाकण्यात आली असून सायफन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अखंडित पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सांबरवाडी येथे २५ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. कास परिसरातून येणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक उताराचा वापर करून १ मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याचाही या योजनेत समावेश आहे.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुधारित योजनेचा नवीन विकास आराखडा (डीपी) तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात साठवण टाक्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर सातारा शहराला कास तलावातून थेट पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी खरेदी करण्याची आवश्यकता संपुष्टात येऊन सातारा पालिकेच्या तिजोरीत दरमहा सुमारे १० लाख रुपयांची बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, शहराला चोवीस तास पाणीपुरवठा तातडीने सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र आणि साठवण टाक्यांची कामे पूर्ण होऊन चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच अखंडित पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.


