सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले असून गेल्या २४ तासांत महाबळेश्वर, कोयनानगर आणि नवजा परिसरात विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात अवघ्या २४ तासांत तब्बल ६.७६ टीएमसीची भर पडली आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद ७८ हजार ३२२ क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने जलसंपदा विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे.
महाबळेश्वरमध्ये रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अनेक वर्षांचे विक्रम मोडले. अवघ्या २४ तासांत येथे तब्बल ४७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयनानगर येथे २५७ मिलीमीटर, तर नवजा येथे २४४ मिलीमीटर पाऊस पडला. या तिन्ही ठिकाणांसह पश्चिम घाटातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
कोयना धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणात १७.८० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तो वाढून २२.५४ टीएमसी झाला. केवळ एका दिवसात धरणातील पाणीसाठ्यात झालेली ६.७६ टीएमसी वाढ ही यंदाच्या मान्सूनमधील सर्वाधिक वाढ मानली जात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुढील काही तासांत आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम महाबळेश्वरच्या पर्यटनस्थळांवर झाला आहे. लिंगमळा धबधब्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धबधब्याकडे जाणारा मार्ग प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे. परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून पर्यटकांनी बंदी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आजही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सततच्या पावसामुळे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा तलाव तुडुंब भरला असून परिसरातील नैसर्गिक सौंदर्य खुलले असले तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील मोरणा आणि महिंद परिसरासह सातारा तालुक्यातील ठोसेघर परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि कृष्णा या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून पश्चिम भागातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी विनाकारण नदीपात्र, धबधबे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन घाटरस्त्यांवर प्रवास करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुढील २४ ते ४८ तास सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून पावसाचा जोर कायम राहिल्यास कोयना धरणातील पाणीसाठा आणखी वेगाने वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


