मुंबई प्रतिनिधी
मुंबईत बेस्ट बस अपघातांच्या घटनांमुळे आधीच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, आता एका बेस्ट बस चालकाच्या बेजबाबदार वर्तनामुळे बेस्ट प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुलुंड येथील एम. जी. रोडवर अवघ्या ३० रुपयांच्या शेवपुरीसाठी चालकाने भररस्त्यात बस तब्बल २० मिनिटांहून अधिक काळ उभी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, जाब विचारणाऱ्या नागरिकाशी चालकाने अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित चालकावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
बेस्ट बस चालकाचा बेजबाबदारपणा, शेवपुरीसाठी बस थांबवली pic.twitter.com/jBSUomlqQF
— prashant gomane (@GomanePrashant) July 10, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या एम. जी. रोड परिसरातून जात असलेल्या बेस्ट बसचा चालक रस्त्याच्या कडेला शेवपुरी खाण्यासाठी थांबला. मात्र, बस योग्य ठिकाणी न उभी करता ती थेट रस्त्यावरच उभी करण्यात आली. परिणामी, मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सुमारे वीस मिनिटे बस जागेवरच उभी असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचा संताप अनावर झाला.
यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका तरुणाने चालकाला बस रस्त्यावर का उभी केली, असा जाब विचारला. मात्र, चूक मान्य करण्याऐवजी चालकाने त्या तरुणाशी उद्धटपणे वागत शिवीगाळ केली. “जा तुझ्या बापाला दाखव, आईला दाखव आणि पोलिसांनाही दाखव… मी कोणालाच घाबरत नाही,” असे म्हणत चालकाने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने बस सुरू करून तेथून निघून गेला.
ही संपूर्ण घटना संबंधित तरुणाने मोबाईलमध्ये चित्रित केली होती. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेक नागरिकांनी चालकाच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करत बेस्ट प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घेतली. बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उतळे यांनी मुलुंड आगार व्यवस्थापकाला संबंधित चालकाची चौकशी करून नियमानुसार योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.
दरम्यान, शुक्रवारीच अंधेरी सबवे परिसरात बेस्ट बसच्या अपघातात तीन जण जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता चालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा हा प्रकार समोर आल्याने बेस्टच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच वाहतूक नियमांचे पालन करणे अपेक्षित असताना अशा घटना नागरिकांच्या संतापात भर घालत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या प्रकरणात चौकशीनंतर संबंधित चालकावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बेस्ट प्रशासन कोणती कठोर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


