सातारा प्रतिनिधी
राज्य आणि केंद्र शासनाच्या शिक्षणविषयक धोरणांविरोधात सातारा जिल्ह्यातील शिक्षकांनी गुरुवारी एकवटत जोरदार एल्गार पुकारला. विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. “शिक्षकांना शिक्षक म्हणूनच काम करू द्या”, “टीईटीची सक्ती रद्द करा”, “अशैक्षणिक कामांचा बोजा हटवा”, “जुनी पेन्शन योजना लागू करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्यांचे सदस्य, शिक्षणप्रेमी आणि पालक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. शासनाच्या शिक्षण धोरणांमुळे शिक्षकांवर अन्याय होत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
टीईटीची सक्ती तातडीने रद्द करावी, स्पर्धा परीक्षा व नियमानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांवर पुन्हा पात्रतेची अट लादू नये, अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात आली. तसेच बीएलओ, एसआयआर आणि इतर अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनाचे नुकसान होत असल्याने ही जबाबदारी सुशिक्षित बेरोजगार युवकांकडे सोपवावी, अशी मागणीही शिक्षकांनी केली.
याशिवाय सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी, पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण असण्याची अट रद्द करून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, संचमान्यतेचे धोरण मागे घ्यावे आणि शिक्षकांना कायमस्वरूपी अशैक्षणिक कामांतून मुक्त करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे सादर करण्यात आले.
“शिक्षकांचा सातत्याने होणारा अपमान आणि वाढता प्रशासकीय हस्तक्षेप आता सहन केला जाणार नाही. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, विश्वंभर रणनवरे, महेंद्र जानुगडे, गणेश जाधव, दीपक भुजबळ, किरण यादव, राजेश शिंगाडे, उदय भंडारे, शरद यादव, सुलभा सस्ते, सुनिता देवकर, जयश्री कदम, मच्छिंद्र ढमाळ, रितेश गायकवाड, नवनाथ जाधव, विशाल कणसे, विजय शिर्के, समीर बागवान यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे हजारो शिक्षक सहभागी झाले.
शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला.


