मुंबई प्रतिनिधी
राम मंदिरातील दानपेटी प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या वादाला नवे वळण मिळाले आहे. शिंदे यांच्या आरोपांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा अभिनेते आदेश बांदेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, “माझ्या कार्यकाळात गैरव्यवहार सिद्ध झाला तर मला सिद्धिविनायक मंदिरासमोर फासावर द्या,” असे आव्हान दिले.
विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, “टीका करणाऱ्यांच्या सरकारच्या काळात सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली गेली,” असा गंभीर आरोप करत त्यावेळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर बांदेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
सध्या आषाढी वारीत सहभागी असलेले बांदेकर म्हणाले, “माझा कार्यकाळ संपून तीन वर्षे झाली आहेत. त्यानंतर मंदिराचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे आहे. माझ्या कार्यकाळातील सर्व आर्थिक व्यवहार, बैठकींचे इतिवृत्त, मंजुऱ्या आणि आवश्यक कागदपत्रे वेळोवेळी विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आली आहेत. मंदिरातील कार्यकारी अधिकारी आणि वित्त अधिकारी हे शासनाने नियुक्त केलेले असतात. त्यामुळे कोणताही गैरव्यवहार झाला असेल तर त्याची अधिकृत माहिती सरकारने जाहीर करावी.”
आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त करत बांदेकर म्हणाले, “बातम्यांच्या आधारे बेछूट आरोप करण्यात काही अर्थ नाही. जर माझ्या कार्यकाळात एक जरी गैरव्यवहार सिद्ध झाला, तर मला सिद्धिविनायक मंदिरासमोर फासावर द्या. मात्र, कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप करून दिशाभूल करू नका.”
ते पुढे म्हणाले, “माझ्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सर्व निर्णय पारदर्शक पद्धतीने घेण्यात आले. पहिल्या तीन वर्षांत भाजपचे सदस्यही ट्रस्टमध्ये माझ्यासोबत कार्यरत होते. प्रत्येक बैठकीचे अधिकृत रेकॉर्ड आणि आर्थिक कागदपत्रे शासनाकडे उपलब्ध आहेत. जर त्यामध्ये काही चुकीचे आढळले, तर माझ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.”
विद्यमान कारभारावरही अप्रत्यक्ष भाष्य करत बांदेकर म्हणाले, “गैरव्यवहार लपवण्यासाठी इतरांवर आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती समोर आणावी. धूर दिसला म्हणून आग लागली असे समजू नये. सत्य बाहेर आलेच पाहिजे.”
शेवटी आपल्या भूमिकेवर ठाम राहत त्यांनी सांगितले, “आजही मी गणपती बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. माझा कारभार पूर्णपणे स्वच्छ आणि पारदर्शक होता. त्यामुळे विनाकारण बदनामी करणारे आरोप थांबवावेत, हीच माझी विनंती आहे.”


