आग्रा:
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे अंगावर काटा आणणारे हत्याकांड उघडकीस आले असून तब्बल 45 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्याच घरातील बाथरूमच्या फरशीखाली पुरलेला आढळला. या प्रकरणात मृताची पत्नी रुबी हिला पोलिसांनी अटक केली असून प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना आग्रा शहरातील सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका धाम कॉलनीत घडली. सुरेंद्र कुमार शर्मा (वय 44) हे 18 मेपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक प्रयत्न करत होते. दरम्यान, पत्नी रुबी सातत्याने “ते कुठेतरी गेले आहेत, परत येतील,” असे सांगत होती. अखेर 26 मे रोजी तिनेच पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती.
तपासादरम्यान काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा सुरेंद्र यांच्या घराची पाहणी केली. यावेळी रुबीच्या हालचाली आणि सुरेंद्रचा भाऊ अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला.
घराची झडती घेत असताना पोलिसांची नजर बाथरूममधील नव्याने केलेल्या प्लास्टरवर गेली. संशय आल्याने फरशी उकरण्यात आली. खोदकाम सुरू करताच फरशीखाली पुरलेला सुरेंद्र यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
प्राथमिक तपासानुसार, सुरेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये पुरण्यात आला. त्यानंतर वरून माती टाकून फरशी बसवून प्लास्टर करण्यात आले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.
पोलिसांनी रुबीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. हत्येपूर्वीच बाथरूमच्या कामासाठी मिस्त्री व मजूर बोलावण्यात आल्याची माहितीही तिने दिली आहे. मात्र या कटात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुरेंद्र यांना दारूचे व्यसन होते आणि त्यातून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. सुरेंद्र बेपत्ता झाल्यानंतर रुबीनेच नातेवाईकांना संपर्क करून शोधमोहीम सुरू केल्याचा आव आणल्याचेही तपासात समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, न्यायवैद्यक अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


