भोपाल :
राम मंदिरासाठी दिलेल्या देणगीच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर गंभीर आरोप केले आहेत. आपण राम मंदिरासाठी दिलेली १ लाख ११ हजार रुपयांची देणगी परत मिळावी, यासाठी अयोध्येतील न्यायालयात दावा दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
भोपाल येथे महिला काँग्रेसच्या आंदोलनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह म्हणाले की, राम मंदिरासाठी श्रद्धेने दिलेल्या देणगीचा अपहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे आपण दिलेली रक्कम परत मिळावी, जेणेकरून ती योग्य ठिकाणी पुन्हा जमा करता येईल, अशी मागणी ते न्यायालयात करणार आहेत. पोलिसांवर विश्वास नसल्याने थेट न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर उज्जैनमधील कथित भ्रष्टाचार आणि अयोध्येतील देणगी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ उज्जैन ते अयोध्या अशी पदयात्रा काढण्याची घोषणाही त्यांनी केली. ही यात्रा २ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता असून, तिचा कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा त्यांनी केला.
श्रद्धेने दिली होती देणगी
राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १ लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यापेक्षा अधिक रक्कम देण्याच्या उद्देशाने आपण १ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली होती, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. तसेच ही रक्कम अधिकृत पावतीसह जमा करण्यात आली असून, याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिल्याचा दावा त्यांनी केला.
ट्रस्टच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
दिग्विजय सिंह यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. ट्रस्टमध्ये पारंपरिक धार्मिक नेतृत्वाचा अभाव असल्याचा दावा करत त्यांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप केला.
‘देणगीतून १० ते २० टक्के रक्कम गायब’
राम मंदिरात दररोज जमा होणाऱ्या देणगीतून १० ते २० टक्के रक्कम रोख स्वरूपात गायब होत असल्याचा गंभीर आरोप दिग्विजय सिंह यांनी केला. या कथित प्रकारात काही बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकार भाविकांच्या श्रद्धेला धक्का देणारा असल्याचे ते म्हणाले.
‘गावागावातून आलेल्या विटांचाही हिशेब नाही’
राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून पाठविण्यात आलेल्या विटांचाही आजपर्यंत स्पष्ट हिशेब समोर आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. धर्म आणि श्रद्धेच्या नावावर लोकांकडून पैसा गोळा करून त्याचा गैरवापर होत असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी केलेल्या आरोपांवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट किंवा भारतीय जनता पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


