अलिबाग प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून सलग दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी महाड, रोहा, नागोठणे, खोपोली, रसायनी, आपटा आदी भागांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याचे आदेश दिले असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पूराच्या पाण्याने अनेक बाजारपेठा, रस्ते, पूल आणि निवासी भाग जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
नागोठण्यात दुसऱ्या दिवशीही पूराचा विळखा
अंबा नदीने धोक्याची पातळी मोठ्या फरकाने ओलांडल्याने नागोठणे शहराला सलग दुसऱ्या दिवशीही पुराचा वेढा पडला आहे. नदीची धोक्याची पातळी ९ मीटर असताना पाणी १२.२० मीटरपर्यंत पोहोचले आहे.
यामुळे शहरातील मच्छीमार्केट, बसस्थानक, मुख्य बाजारपेठ तसेच अन्य सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
कुंडलिकेच्या पुराने रोहा जलमय
सततच्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीलाही मोठा पूर आला असून रोहा शहरासह अष्टमी परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीची धोक्याची पातळी २३ मीटर असताना पाण्याची पातळी २४.१० मीटरवर पोहोचली आहे.
रोहा शहरातील बाजारपेठ, दमखाडी, रायकर पार्क, तसेच अष्टमी परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. भुवनेश्वर परिसरातील काही वस्त्याही पाण्याखाली गेल्या आहेत.
रोहा-अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय रोहा-कोलाड मार्गावरील तीन ठिकाणी पाणी आल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावित्रीच्या पुराने महाड पुन्हा संकटात
महाबळेश्वर, पोलादपूर आणि रायगडच्या डोंगरपट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने रविवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे महाड शहरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील सुकट गल्ली, मच्छी मार्केट, बाजारपेठ या भागांत रात्री उशिरापर्यंत पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. दुकाने आणि गोदामांतील माल सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी व्यापाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले.
दादली पूल पाण्याखाली गेल्याने शहरातील संपर्क विस्कळीत झाला. प्रशासनाने भोंगे वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. अनेक नागरिकांनी आपल्या वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी ती मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षित ठिकाणी हलवून ठेवली.
सावित्री नदीची धोक्याची पातळी ६.५० मीटर असून सध्या नदी ७.६० मीटरवरून वाहत आहे.
पाताळगंगेच्या पुराने खोपोली, रसायनी, आपटा जलमय
लोणावळा आणि खोपोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीलाही मोठा पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी गाठल्याने खोपोली, रसायनी आणि आपटा परिसरातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत.
शिळफाटा, शिलगाव, मस्जिद मोहल्ला, पटेल नगर या भागांतील अनेक घरांमध्ये रात्री पुराचे पाणी शिरले. पेण-खोपोली मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील वीजपुरवठाही तात्पुरता खंडित करण्यात आला.
पाताळगंगा नदीची धोक्याची पातळी २१.५२ मीटर असून नदी सध्या त्याच पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
प्रशासन सतर्क; नागरिकांना सावधगिरीचे आवाहन
रायगड जिल्ह्यातील सर्वच पूरग्रस्त भागांत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूरस्थिती लक्षात घेता अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाभर सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.


