स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील खार परिसरातून हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर करून टोयोटा फॉर्च्युनर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय वाहनचोरी रॅकेटचा खार पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुजरातमधील राजकोट येथून दोघा सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे ४५ लाख रुपये किमतीची चोरीस गेलेली फॉर्च्युनर, ब्लूटूथ कार स्कॅनर आणि दोन महागडे ॲपल मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी खार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३३६(३), ३४०(२) आणि ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दीप रमणीकभाई आघेर (२८) आणि राहुल भरतभाई घियाल (२९, रा. राजकोट, गुजरात) अशी असून, ३० जून रोजी राजकोट तालुका पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार येथील एस. व्ही. रोडवरील टोयोटा शोरूममध्ये ग्राहकांच्या टेस्ट ड्राइव्हसाठी वापरण्यात येणारी टोयोटा फॉर्च्युनर २४ जूनच्या रात्री पार्क करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वाहन जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोरूम व्यवस्थापनाने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींनी स्मार्ट-की सिग्नल क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरीनंतर वाहनावर बनावट क्रमांकाची प्लेट बसवून पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, वाहनावरील विशिष्ट खुणा आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे खार पोलिसांनी वाहनाचा माग काढला.
तांत्रिक तपासातून आरोपींचे लोकेशन गुजरातमधील राजकोट येथे मिळताच खार पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची फॉर्च्युनर नवसारी जिल्ह्यातील चिखलीजवळील बिलीमोरा रोड परिसरात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी वाहन हस्तगत केले.
तपासात आरोपींपैकी एक जण वाहनांच्या इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणेत हस्तक्षेप करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि कोडिंगचा वापर करण्यात तरबेज असल्याचे, तर दुसरा वाहनांचे सुरक्षा फीचर्स निष्क्रिय करणे, बनावट नंबर प्लेट बसविणे आणि चेसिसमध्ये छेडछाड करण्यात निष्णात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही टोळी इतर राज्यांतील वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्येही सहभागी आहे का, याचाही तपास सुरू आहे.
या कारवाईत सुमारे ४५ लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर, ५० हजार रुपये किमतीचे ब्लूटूथ कार स्कॅनर उपकरण आणि ८० हजार रुपये किमतीचे दोन ॲपल मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत कुंभारे आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे हाय-टेक पद्धतीने वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.


