नांदेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली असून, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहा येथील रहिवासी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री कौटुंबिक कारणावरून तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात विशालने विनापरवाना गावठी कट्टा काढून पत्नीवर सलग तीन राऊंड गोळीबार केला.
या गोळीबारात एक गोळी अर्चनाच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी तिच्या पाठीत घुसली. तिसरी गोळीही तिच्या दिशेने झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी झालेली अर्चना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी व स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर आरोपी विशाल जाधवने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
तपासादरम्यान विशाल जाधवचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. मे २०२५ मध्ये त्याच्यावर पेट्रोल पंप लुटीचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात असून आरोपीकडे बेकायदा शस्त्र कसे आले, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, लोहा शहरात भरवस्तीत गावठी कट्ट्याचा वापर करून झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात बेकायदा शस्त्रांचा वापर वाढत असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांनी अशा शस्त्रांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
उल्हासनगरात धारदार शस्त्राने भोसकून हत्या
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील कुर्ला कॅम्प चौक परिसरात सोमवारी रात्री आणखी एक धक्कादायक गुन्हा घडला. धारदार शस्त्राने वार करून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली.
मृताचे नाव काला उर्फ सतनाम सिंग लबाना असे असून, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सतनाम सिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या हल्ल्याचा थरार परिसरातील एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनिश सिंग लबाना याने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीचा शोध घेण्याबरोबरच सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन्ही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कौटुंबिक वाद आणि वैयक्तिक वैमनस्याचे गुन्हे किती टोकाला जाऊ शकतात, याची ही गंभीर उदाहरणे मानली जात आहेत.

