नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथील इमामवाडा बसस्थानकातून चोरीला गेलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) ‘शिवाई’ बस अवघ्या काही तासांत हस्तगत करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले. या प्रकरणी तेलंगणातील २३ वर्षीय आंतरराज्यीय चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याने आतापर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सुमारे २० बस चोरी केल्याची कबुली दिली आहे.
राजापेठ पोलिस ठाण्याचे बीट मार्शल सारंग आदमणे आणि विजय धुर्वे यांना गोपनीय माहिती मिळाली की, नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चोरीला गेलेली एमएच-४९ बीझेड-८२५८ क्रमांकाची ‘शिवाई’ बस नंदा मार्केट परिसरात उभी असून, बस चोरणारा संशयित गद्रे चौकात थांबला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बससह ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपले नाव विणू गणपती नीलावर (वय २३, रा. हईतनगर, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा) असल्याचे सांगितले. त्याने १ जुलैच्या मध्यरात्री इमामवाडा बसस्थानकातून चार्जिंगसाठी उभी असलेली बस चोरी केल्याची कबुली दिली. तसेच यापूर्वी तेलंगणा, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून सुमारे २० बस चोरी केल्याचेही त्याने उघड केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, नांदेड येथील बस डेपोमधून बस चोरीप्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, अन्य ठिकाणीही त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर आणि डिस्क काढून त्यांची विक्री केली जात असल्याची कबुलीही आरोपीने दिली.
या कारवाईत सुमारे १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची बस जप्त करण्यात आली असून, पुढील तपासासाठी आरोपीला गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण आणि उमेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे तसेच राजापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.


