स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
मुंबईतील करी रोड परिसरात एका २५ वर्षीय तरुणीच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन धावत्या दुचाकीवरून खेचून पळून जाणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात काळाचौकी पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका १९ वर्षीय तरुणासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा (नाबालिग) समावेश आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली महागडी दुचाकी देखील जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी पहाटे ५:४५ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार कु. अनामिका रवी अंगारी (वय २५) या करीरोड स्टेशनच्या देशाने जात होत्या. त्या चिंचपोकळी येथील वन अविघ्न बिल्डिंगसमोर आल्या असता, पाठीमागून मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या सोन्याच्या चैनचे वजन १० ग्रॅम असून, गोल-गोल कड्या असलेल्या या चैनमध्ये हार्ट (हृदय) आकाराचे लॉकेट होते, ज्याची किंमत सुमारे १,००,०००/- रुपये आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पीडित तरुणीने तातडीने काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांकडून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०९ (४), ३०४, ३१७ (४) (५), आणि ३ (५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २३४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने चार विशेष शोध पथके तयार करण्यात आली. या पथकांनी घटनेच्या ठिकाणचे आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या तांत्रिक कौशल्याच्या (Technical Intelligence) आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अखेर पोलिसांनी मानव सुनील धोटे (वय १९ वर्षे, धंदा-नाही, रा. रूम नं. १०२, बिल्डिंग नं. १५, नटवर पार्क कंपाऊंड, म्हाडा, शिवाजी नगर पोलीस ठाण्यामागे, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई ४३) याच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. अटक केलेला आरोपी मानव सुनील धोटे याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ५०,००० रुपये किमतीची ‘यामाहा’ कंपनीची लाल आणि काळ्या रंगाची ‘R15’ मोटार सायकल (क्रमांक: MH 01 DG 4872) पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
काळाचौकी पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. या कामगिरीत पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त (मध्य परिमंडळ ०२) अनुराग जैन, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (भोईवाडा विभाग) घनश्याम पलंगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तसेच प्रत्यक्ष कारवाईमध्ये काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदीनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शितल माने, पोलीस हवालदार चन्ने, पोलीस हवालदार गोपाळ चव्हाण, पोलीस शिपाई प्रशांत पवार, पोलीस शिपाई नायकवाडी, पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस शिपाई खांडेकर, पोलीस शिपाई चंद्रकांत कुमार, पोलीस शिपाई कोळेकर, पोलीस शिपाई आंग्रे आणि महिला पोलीस शिपाई तेजस्विनी गवारी यांनी अत्यंत मोलाची व उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.


