स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
मुंबई: एअर इंडिया कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा मानखुर्द पोलिसांनी यशस्वीरीत्या पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी थेट उत्तराखंडमधील डेहराडून येथे धाड टाकून बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या ११ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या छाप्यात ९ लॅपटॉप, १३ मोबाईल फोन आणि फसवणुकीसाठी वापरण्यात येणारा बनावट कॉल सेंटरचा संपूर्ण सेटलअप जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मानखुर्द पोलीस ठाण्यात एका फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. फिर्यादीला एअर इंडिया, मुंबई या ठिकाणी प्रतिष्ठित नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात इसमांनी २,५८,००० रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गु.नं.क्र. ९४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(२), ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(क), (ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना ठोस माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्यांचे इतर साथीदार हे डेहराडून, उत्तराखंड येथून हे संपूर्ण रॅकेट चालवत आहेत.
या खात्रीशीर माहितीच्या आधारे मानखुर्द पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक तात्काळ उत्तराखंड येथील डेहराडूनसाठी रवाना झाले. तिथे स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे व धाडसी कारवाई करत बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला आणि घटनास्थळावरून ११ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत गुन्ह्यात वापरले जाणारे सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि संपर्क यंत्रणा जप्त करण्यात आली असून पोलीस आता या टोळीने आणखी किती जणांना अशा प्रकारे फसवले आहे, याचा सखोल तपास करत आहेत.
सदरची धडक आणि कौतुकास्पद कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग धनंजय कुलकर्णी आणि पोलीस उप आयुक्त, पूर्व परिमंडळ ६ समिर शेख यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत प्रत्यक्ष फिल्डवर मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिलाल अहमद अमरूद्दिन शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हणमंत ओऊळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोटे, पोलीस हवालदार जवळ, पोलीस हवालदार दरेकर, पोलीस हवालदार जयेश पाटील, पोलीस शिपाई घोरपडे, पोलीस शिपाई महेश काटकर, पोलीस शिपाई डमाळे, महिला पोलीस शिपाई सुनिता पवार यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन हा यशस्वी तपास पूर्ण केला.


