स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने मोठी कारवाई करत एमटीएनएलच्या भूमिगत कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बोरीवली (पूर्व) येथील मागाठाणे टेलिफोन एक्स्चेंज परिसरात सापळा रचून चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ३० जून रोजी क्लिरिऑन बिल्डिंगसमोरील वसंत मार्वल रोड येथे कारवाई करण्यात आली. यावेळी दोन बोलेरो पिकअप वाहनांमधून एमटीएनएलच्या भूमिगत कॉपर केबलची चोरी करून ती वाहून नेत असताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहिल शकील साह (२०), अब्दुल सिद्दीक अहमद शेख (३८), रिझवान मेहताब मलिक (२४) आणि मोहम्मद अफजल हसन खान (३५) यांचा समावेश आहे. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि दूरसंचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ९८५ मीटर लांबीची २ हजार पेअरची कॉपर केबल, दोन बोलेरो पिकअप, एक जेसीबी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १,००,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात आरोपी अब्दुल सिद्दीक अहमद शेख आणि मोहम्मद अफजल हसन खान यांच्याविरोधात यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या टोळीने मुंबईतील इतर एमटीएनएल केबल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला आहे का, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे तसेच रामकिशन मोरे, धनंजय जाधव, चंद्रशेखर डफळे, अशोक परब, अनिकेत निकम आणि सुधाकर निर्मळे यांनी सहभाग घेतला.


