जळगाव प्रतिनिधी
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. देऊळगाव कापूसवाडी परिसरातील जंगलात ४० वर्षीय महिलेवर तिच्या मित्रासमोरच सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अत्याचारादरम्यान आरोपींनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून रोजी जामनेर तालुक्यातील देऊळगाव कापूसवाडी परिसरातील जंगलात घडली. संबंधित महिला आपल्या मित्रासोबत त्या ठिकाणी बसली असताना १५ जणांचा समूह तेथे आला. सुरुवातीला महिलेची छेड काढण्यात आली. त्यानंतर समूहातील दोघांनी तिच्या मित्रासमोरच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या वेळी इतर आरोपींनी संपूर्ण प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ तयार केला.
घटनेनंतर भीतीपोटी पीडित महिलेने कोणाकडेही तक्रार केली नव्हती. मात्र काही दिवसांनी आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ स्वतः पीडितेच्या निदर्शनास आल्यानंतर तिने तातडीने फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून विविध पुरावे संकलित केले. तपासादरम्यान १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी १४ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. उर्वरित एका आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही कोणासोबत घडल्या असतील, तर पीडितांनी भीती न बाळगता पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून पीडितेला मानसिक त्रास देण्याच्या प्रकाराबाबतही संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून उर्वरित आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


