रणजित मस्के, प्रतिनिधी
सोलापूर : मालवाहतूक कंटेनरमधील महागडे इलेक्ट्रिकल साहित्य चोरून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) सोलापूर ग्रामीणने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत केल्व्हिनेटर कंपनीचे २८ एसी संच जप्त करण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत सुमारे १० लाख ५० हजार रुपये आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.
दरम्यान, मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी चौक परिसरात गस्त घालत असताना एलसीबीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील कारखाना वसाहतीत काही जण चोरीचे केल्व्हिनेटर एसी विक्रीसाठी ग्राहकांच्या शोधात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची शहानिशा करून एलसीबीच्या पथकाने तातडीने टाकळी सिकंदर येथे छापा टाकला. दीपक बाबुलाल सोळूंके यांच्या घरासमोरील पत्राशेडमध्ये तीन संशयित व्यक्ती आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे दीपक बाबुलाल सोळूंके (४७), शहाजी पठाण गायकवाड (२३) आणि प्रदीप रमेश चिंचकर (२६) अशी सांगितली.
पोलिसांनी पत्राशेडची तपासणी केली असता तेथे केल्व्हिनेटर कंपनीचे २८ एसी संच सापडले. या मालाबाबत मालकी हक्काचे कोणतेही वैध कागदपत्र आरोपींकडे नव्हते. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
चौकशीत आरोपींनी एप्रिल अखेर ते मेच्या सुरुवातीदरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथून कोची (केरळ) येथे निघालेल्या मालवाहतूक कंटेनरमधून हे एसी चोरी केल्याची कबुली दिली. कंटेनरच्या चालकासोबत संगनमत करून वाहनाच्या मागील बाजूचा सील तोडण्यात आला होता. त्यानंतर कंटेनरमधील २८ एसी संच काढून घेण्यात आले होते.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १० लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


