स्वप्नील गाडे, प्रतिनिधी
मुंबई : अल्पवयीन मुलाला पैशांचे आमिष दाखवत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन फसवणुकीने घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला खार पोलिसांनी अटक केली आहे. सुरज विक्रम बनसोडे उर्फ सुर्या उर्फ राजेश (वय ३८, रा. आंबेडकर रोड, माटुंगा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन शंभर टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
खार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ६७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र यश हे खारदांडा परिसरात उभे होते. त्यावेळी आरोपी सुरज बनसोडे त्यांच्याजवळ आला. एअरटेल कंपनीची छत्री लावण्याचे काम असून त्यासाठी ८०० रुपये मिळतील, असे आमिष त्याने मुलांना दाखवले. त्यानंतर त्यांना खार येथील खळा मैदानाजवळील बसथांब्याच्या मागील भागात नेले.
तेथे आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची आणि अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन पाहून त्यामध्ये सोन्याची बॅट बसवून देतो, असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलाने चेन काढून दिली. मात्र चेन हातात मिळताच आरोपी तेथून पळून गेला.
घटनेनंतर खार पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी धारावीतील टाटा पॉवर हाऊस परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०१ वाजता त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन शंभर टक्के हस्तगत करण्यात आली असून न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक हणमंत कुंभारे, पोलीस हवालदार कदम तसेच पोलीस शिपाई लहामगे, सावंत, कोळेकर, भामरे, अहिवळे आणि बांद्रा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई काकडे यांचा समावेश होता.


