रणजित मस्के, प्रतिनिधी
नारायणगाव : जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल वायर चोरी करून शेतकऱ्यांना आर्थिक फटका देणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मध्य प्रदेशातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे केबल चोरीचे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रांमधील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल वायर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. उन्हाळ्याच्या काळात सिंचनासाठी आवश्यक असलेल्या केबल चोरीला जात असल्याने शेतकरी हैराण झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने या घटनांची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध घटनास्थळांना भेटी देऊन तपास सुरू केला. तपासादरम्यान सर्व चोरीच्या घटना एकाच टोळीने केल्याचे लक्षात आले. गोपनीय माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे गुन्हे मध्य प्रदेशातील आरोपी करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी चोरीच्या परिसरात काही दिवस वास्तव्यास राहून रात्रीच्या वेळी कृषीपंपांच्या केबल वायर चोरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांचे पथक नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे दाखल झाले. तेथे सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरज्या छत्तेसिंग पवार (वय १९), गगन शापिलाल चौहान (वय १९), अतुल शापिलाल चौहान (वय २१), तपसलाल सर्कस पवार (वय ५०) आणि सुरज रामसर आदिवासी (वय ४०) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे नारायणगाव पोलिस ठाण्यातील आठ, ओतूर पोलिस ठाण्यातील दोन, जुन्नर पोलिस ठाण्यातील एक आणि पारगाव पोलिस ठाण्यातील एक असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सध्या सर्व आरोपी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे व धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सपोनि महादेव शेलार, सपोनि प्रविण सपांगे, सफौजदार दीपक साबळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


