स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई : तब्बल २३ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीला सतत गैरहजर राहून पोलिसांच्या नजरेआड असलेल्या आरोपीचा शोध गोपनीय माहितीच्या आधारे घेण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सलीम मोहम्मद नबी शेख उर्फ पप्पू (वय ५५) असे असून तो चुनाभट्टी येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंट परिसरात राहत होता. त्याच्याविरोधात २००३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या ७१ व्या न्यायालयात सुरू होती. मात्र आरोपी सतत गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याच्या नावाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीरनामा जारी केला होता. त्यानंतर आरोपी दीर्घकाळापासून फरार होता.
सांताक्रूझ पोलिसांचे तडीपार पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी आपली ओळख लपवून चुनाभट्टी परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि २० जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची ओळख पडताळून त्याला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आणले आणि पुढील कायदेशीर कारवाई करत अटक केली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आव्हाड, पोलीस हवालदार अजय गोडसे आणि पोलीस शिपाई प्रशांत मखरे यांनी केली.


