महाड प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राजधानी रायगडावर ५ आणि ६ जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शौर्य, इतिहास, संस्कृती आणि भक्ती यांचा संगम घडविणाऱ्या या दोन दिवसीय सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी, वारकरी आणि शिवकालीन परंपरांचे अभ्यासक रायगडावर दाखल होणार आहेत. ‘जागर शौर्य भक्तीचा’ या संकल्पनेवर आधारित सोहळ्यात ऐतिहासिक विधी, पारंपरिक कला, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, रायगडचे उपाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत या सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक क्षण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्वराज्याच्या वैभवशाली परंपरांचे जतन करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
पाचाडपासून रायगडापर्यंत उत्साहाचे वातावरण
शुक्रवारी, ५ जून रोजी दुपारी ३.३० वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊ स्मृतिस्थळाला अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. स्वागतानंतर रायगड चढाईला प्रारंभ होणार असून, शिवभक्तांच्या जयघोषात ऐतिहासिक गड पुन्हा एकदा स्वराज्याच्या आठवणींनी दुमदुमून जाणार आहे.
रायगडावर आगमनानंतर नगारखान्यात स्वागत समारंभ पार पडेल. सायंकाळी ४.३० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ‘धार तलवार पीठ’ तसेच ‘युद्धकला महाराष्ट्राची’ या विशेष उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानंतर ढोल-ताशा पथके, लेझीम कलाकार आणि वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.
रात्री ८ वाजता राजसदर येथे ‘जागर शिवशौर्याचा, स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवकालीन पराक्रम, स्वराज्याचा संघर्ष आणि महाराजांच्या दूरदृष्टीचा वेध घेणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. रात्री ९ वाजता शिरकाई देवी मंदिरात पारंपरिक गोंधळ होईल, तर रात्री ९.३० वाजता जगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायाकडून कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम सादर केला जाईल.
६ जूनला राज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा
शनिवारी, ६ जून रोजी राज्याभिषेक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी ७ वाजता नगारखान्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहणाने प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, स्वराज्याचा इतिहास आणि शिवचरित्रावर आधारित पोवाडे व शाहिरी सादरीकरणांमधून वातावरण शिवमय होणार आहे.
सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीचा पारंपरिक अभिषेक करण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
यानंतर सकाळी ११ वाजता शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता पालखी जगदीश्वर मंदिरात पोहोचेल. त्यानंतर दुपारी १२.१५ वाजता वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरा यांच्यातील सांस्कृतिक व आध्यात्मिक नात्याचे प्रतीक मानला जाणारा हा क्षण सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
दुपारी १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करण्यात येईल आणि याच कार्यक्रमाने दोन दिवसांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता होईल.
हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीची अपेक्षा
रायगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून स्वराज्याच्या अस्मितेचे आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त रायगडावर उपस्थित राहणार आहेत. ऐतिहासिक परंपरा, धार्मिक विधी, युद्धकला, शाहिरी आणि वारकरी संस्कृती यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी या सोहळ्याच्या माध्यमातून मिळणार असून, रायगडावर पुन्हा एकदा शिवमय वातावरण निर्माण होणार आहे.


