अहिल्यानगर प्रतिनिधी
राहुरी : कौटुंबिक वादातून राहुरी तालुक्यात एका नातवाने आपल्या ६५ वर्षीय चुलत आजोबांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात दगडू कोहकडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी प्रवीण कोहकडे फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कोहकडे आणि दगडू कोहकडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. या वादातून यापूर्वीही दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी वाहनांना आग लावल्याच्या प्रकरणातही गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील तणाव कायम होता.
शुक्रवारी दुपारी दगडू कोहकडे यांना गाठून प्रवीण कोहकडे याने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे. गोळी छातीत लागल्याने दगडू कोहकडे गंभीर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे संकलित केले आहेत. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे राहुरी परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून थेट गोळीबारापर्यंत मजल गेल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.


