सुधाकर नाडर, प्रतिनिधी
पवई परिसरातील लोढा सुप्रीमस आउट गेटजवळ झालेल्या एका भीषण हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट १० च्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातच्या सुरत येथून मुख्य आरोपीला अटक केली आहे. एका आठवड्यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून ही हत्या केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २४ मे रोजी पवईतील लोढा सुप्रीमस आउट गेट परिसरात युसूफ (वय ५५) नावाच्या व्यक्तीची अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखा युनिट १० च्या पथकाने तपासाला सुरुवात केली.
तांत्रिक तपासातून आरोपी सापडला
घटनास्थळाच्या आसपासचे १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तांत्रिक तपासाद्वारे आरोपीची ओळख पटली. तो सुरत, गुजरात येथील पुष्प नगर, राजस्थानी स्कूल जवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने सुरत गाठून आरोपी दीपक ऊर्फ दीपू नथुप्रसाद वर्मा (वय २६, मूळ रा. लाली टिका माऊ, जि. बांदा, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आठवड्याभरापूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचे मान्य केले.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी पश्चिम) सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट १० चे पोलीस निरीक्षक गिरीश राजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पूनम यादव, अश्विनी रायबोले, योगेश जाधव, संग्राम पाटील (कक्ष ८), पोलीस उपनिरीक्षक थारळकर, पोलीस हवालदार माने, धनवडे, जगताप, मोरे, जाधव, पोलीस अंमलदार डफळे, निकम, मांडवे, निर्मळे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार संग्राम अत्रि आणि पोलीस हवालदार राहुल सकट (कक्ष ८) या पथकाचा समावेश होता.


