रायगड प्रतिनिधी
रायगड : दारू पार्टीदरम्यान चकण्यासाठी आंबे तोडून आणण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
२५ मे रोजी सकाळी गावाजवळील एका वडाच्या झाडाखाली रक्तबंबाळ अवस्थेत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली.
तपासादरम्यान मृत मुलाच्या मोठ्या भावाने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. २४ मे रोजी सकाळी गावातील ऋषी डनसेना हा मृत मुलाला कामासाठी सोबत घेऊन गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
पोस्टमार्टम अहवालात मुलाचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयाच्या आधारे ऋषी डनसेनाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने मृत मुलाला आपले मित्र चंद्रशेखर उर्फ चंदा डनसेना, रघुसिंग उर्फ रघुनाथ राठिया आणि एका अल्पवयीन मुलासोबत सोडल्याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन स्वतंत्रपणे चौकशी केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दारू पार्टी सुरू असताना चकण्यासाठी आंबे तोडून आणण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर तिघांनी मिळून अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीदरम्यान तो शेताच्या बांधावरून घसरून तलावाच्या बाजूला पडला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावा लपविण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह उचलून वडाच्या झाडाखाली आणून ठेवला. हा मृत्यू अपघाती असल्याचा आभास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
पोलिसांनी आरोपींना अटक करून घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचा घटनाक्रम समजून घेतला आहे. तसेच आरोपींचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून पुढील तपास सुरू आहे.


