मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला अखेर उद्या विराम मिळणार असून इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालय वाटप करण्यात येणार असून, प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर थेट संदेशही पाठविण्यात येणार आहेत.
यंदा अकरावी प्रवेशासाठी तब्बल १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, या प्रक्रियेत काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. सुमारे १६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना लिंगाची नोंदच केलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अर्ज पडताळणीच्या प्रक्रियेत प्रशासनाला अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात ३ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर महाविद्यालय वाटपाची माहिती दिसणार आहे. त्याचबरोबर संबंधित महाविद्यालयांच्या नावांसमोर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादीही पोर्टलवर उपलब्ध असणार आहे.
पहिल्या यादीचा ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता
यंदा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पहिल्या प्रवेश फेरीतील ‘कट ऑफ’ अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत अपेक्षित महाविद्यालय मिळण्याची शक्यता कमी असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळणार नाही, त्यांना पुढील फेरीपूर्वी अर्जामधील महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील फेरीत अधिक वास्तववादी पर्याय निवडण्याची मुभा मिळणार आहे.
‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक अनिवार्य
ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी पोर्टलवरील ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
तर ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, त्यांनी तो पर्याय नाकारून पुढील फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
व्यवस्थापन, अल्पसंख्यांक कोट्याची यादीही उद्याच
सामान्य प्रवेश प्रक्रियेबरोबरच व्यवस्थापन, संस्थाअंतर्गत आणि अल्पसंख्यांक कोट्यांतील प्रवेशाची पहिली यादीदेखील शुक्रवारीच प्रसिद्ध होणार आहे. या कोट्यांमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतर उर्वरित रिक्त जागांची माहिती महाविद्यालयांना जाहीर करावी लागणार आहे. त्यानंतरच दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी जागांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
दुसरी फेरी ५ जूननंतर
माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुसरी प्रवेश फेरी ५ जूननंतर जाहीर होणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन प्रवेश फेऱ्याही टप्प्याटप्प्याने पार पडतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ जुलै किंवा जास्तीत जास्त १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एकूण पाच प्रवेश फेऱ्या; शेवटची फेरी मुलींसाठी विशेष
यंदा अकरावी प्रवेशासाठी एकूण पाच प्रवेश फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत. यातील शेवटची फेरी विशेषतः मुलींसाठी राखीव असणार आहे. प्रत्येक फेरीपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे.
विद्यार्थी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत नोंदणी सुरूच राहणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
दरम्यान, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणाऱ्या या प्रक्रियेकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असून, पहिल्या गुणवत्ता यादीत कोणाला पसंतीचे महाविद्यालय मिळते याकडे राज्यभरातून उत्सुकता व्यक्त केली जात आहे.


