मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या परिरक्षण विभागातील उपलब्ध मनुष्यबळाचा अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम वापर करून शहरातील रस्ते, पदपथ आणि दुभाजकांच्या देखभाल-दुरुस्ती कामांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष बदल जाणवला पाहिजे, असे स्पष्ट आणि कडक निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करून पालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांकडूनच नियमित देखभाल कामे करून घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
महापालिकेच्या परिरक्षण चौक्यांमध्ये आवश्यक आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही संबंधित अभियंत्यांकडून अपेक्षित दर्जाचे पर्यवेक्षण होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर २६ प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील परिरक्षण चौक्यांचा सखोल आढावा घ्यावा, असे निर्देश भिडे यांनी दिले. दगडी कड्यांची दुरुस्ती, रस्ता दुभाजकांची देखभाल, पदपथ दुरुस्ती यांसारखी लहान-मोठी कामे पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फतच प्राधान्याने पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील रस्ते देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये नागरिकांना दृश्य स्वरूपात सकारात्मक बदल जाणवेल, अशा पद्धतीने सहायक अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांनी नियोजनबद्ध आणि उत्तरदायित्वपूर्ण कामकाज करावे, अशी ताकीदही आयुक्तांनी दिली.
बुधवारी सकाळी अश्विनी भिडे यांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा व्यवस्थापन चौकी, विलेपार्ले येथील टाटा कंपाऊंडमधील कीटकनाशक चौकी तसेच बजाज मार्गावरील परिरक्षण चौकीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचे स्वरूप, कामाच्या वेळा तसेच काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. चौक्या अधिक सुस्थितीत आणि सेवायुक्त ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गैरहजेरीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश
कीटकनाशक नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची पाहणी करत भिडे यांनी त्यांची कार्यपद्धती कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेतली. मूषक नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना, चौकीतील एकूण कामकाज तसेच उपस्थिती नोंदवहीची त्यांनी तपासणी केली. कर्मचारी गैरहजेरीचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
पावसाळ्यापूर्व तयारीचा घेतला आढावा
दरम्यान, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त भिडे यांनी इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गझधरबांध पर्जन्यजल उदंचन केंद्राला भेट देऊन कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपसा संच सतत कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.
जुहू येथील इर्ला पर्जन्यजल उदंचन केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिले पाहिजे, जेणेकरून मिलन भुयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक आणि जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थितीपासून दिलासा मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले.
समुद्रात जाणारा कचरा रोखण्यावर भर
जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा घनकचरा आणि तरंगता कचरा रोखण्यासाठी यांत्रिक जाळी प्रणाली अर्थात ‘बॅक आणि फ्रंट बार स्क्रीन’चा प्रभावी वापर करण्याचे स्पष्ट निर्देशही भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यात नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पालिकेच्या यंत्रणेला अधिक उत्तरदायी, परिणामकारक आणि नागरिकाभिमुख बनवण्याच्या दृष्टीने आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका प्रशासनासाठी स्पष्ट संदेश मानली जात आहे.


