मुंबई प्रतिनिधी
बकरी ईद म्हटलं की बाजारात बकऱ्यांची लगबग, खरेदीसाठी गर्दी, घराघरातील तयारी आणि कुर्बानीची परंपरा अशीच चित्रं डोळ्यासमोर उभी राहतात. मुस्लिम बांधव श्रद्धेनुसार प्राण्यांची कुर्बानी देत हा सण साजरा करतात. मात्र यंदा उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम कुटुंबाने बकरी ईद साजरी करण्याची अशी वेगळी पद्धत निवडली की, त्याची देशभर चर्चा रंगली आहे.
Hats off to Agra lawyer Gul Chaman Sherwani! 🙌
On Eid-ul-Adha, instead of sacrificing an animal, he chose to cut a goat-shaped cake.
A beautiful and thoughtful gesture promoting kindness and compassion towards animals.
This is the kind of positive change our society needs.… pic.twitter.com/VAI1OiCtmj
— Aman Dubey (@Amandud2) May 28, 2026
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका कुटुंबाने बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्याची कुर्बानी न देता चक्क बकऱ्याच्या फोटोचा केक कापत मानवता, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.
आग्र्यातील कुटुंबाचा वेगळा संदेश
ही घटना आग्रा शहरातील शाहगंज परिसरातील तिरंगा मंजिल शेरवानी मार्ग येथे घडल्याचे सांगितले जात आहे. येथील वकील गुल चमन शेरवानी आणि त्यांच्या कुटुंबाने बकरी ईदच्या निमित्ताने घरी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी बकऱ्याच्या फोटोसह खास केक तयार करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आनंदात हा केक कापून बकरी ईद साजरी केली.
या अनोख्या सेलिब्रेशनमागे कोणत्याही धार्मिक परंपरेचा अपमान नसून समाजात प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
“खरी कुर्बानी म्हणजे मनातील वाईट विचारांचा त्याग”
गुल चमन शेरवानी यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. “अल्लाह माणसाचा दिखावा पाहत नाही, तर त्याची नीयत पाहतो. खरी कुर्बानी म्हणजे स्वतःमधील लोभ, अहंकार, द्वेष आणि वाईट विचारांचा त्याग करणं,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, आज अनेक ठिकाणी कुर्बानीच्या नावाखाली आर्थिक प्रदर्शन केले जाते. मात्र श्रद्धा ही दिखाव्यापेक्षा मनाच्या शुद्धतेत असते. “मनापासून केलेली छोटी कृतीही अल्लाहपर्यंत पोहोचते,” असेही त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियावर चर्चांचा पूर
या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चांचा पूर आला. अनेकांनी या कुटुंबाच्या निर्णयाचे स्वागत करत “मानवतेचा खरा संदेश”, “प्रेम आणि शांततेची नवी दिशा” अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींनी याला “बकरी ईद साजरी करण्याची आधुनिक आणि संवेदनशील पद्धत” असेही म्हटले.
तर काहींनी धार्मिक परंपरांवरही चर्चा सुरू केली. मात्र या सर्व चर्चांमध्ये गुल चमन शेरवानी यांच्या कुटुंबाने दिलेला “अल्लाह नीयत पाहतो” हा संदेश अधिक ठळकपणे समोर आला आहे.
प्रेम आणि सौहार्दाचा संदेश
या निमित्ताने कुटुंबाने समाजात द्वेषाऐवजी प्रेम, सहिष्णुता आणि मानवतेचा विचार रुजवण्याचे आवाहन केले. सध्या त्यांच्या या अनोख्या बकरी ईद सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
परंपरा आणि आधुनिक विचार यांचा समतोल साधत दिलेला हा संदेश आता अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.


